पुरंदर विमानतळ होणारच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणेकरांना ग्वाही..!

 


पुरंदर | विजय लकडे 

                        पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना अवघ्या एक ते सव्वा तासात नवी मुंबई विमानतळावर पोहोचता येणार आहे. मात्र, त्यामुळे काही जण प्रश्न विचारतात की नवी मुंबईचा विमानतळ पुण्याला विकायचा प्रयत्न का केला जातोय? मी स्पष्टपणे सांगतो की, पुण्याचे स्वतंत्र दुसरे विमानतळ म्हणजेच पुरंदर विमानतळ आपण करणारच आहोत," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.


ते केंद्रीय सहकार आणि नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शिरोळे रस्त्यावरील '२४ तास जनसंपर्क कार्यालय'च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते मोहोळ यांच्या मंत्रिपदाच्या एक वर्षाच्या कार्याचा अहवाल आणि 'प्रथम माणूस' या करोना काळातील अनुभव कथनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.




बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांची उपस्थिती होती.


या वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मोहोळ यांना मंत्री करण्यात माझे कोणतेही व्यक्तिगत श्रेय नाही. आम्हीही कधी काळी बुथ कार्यकर्ते होतो. भाजप हा असा एकमेव पक्ष आहे जो पुढची फळी तयार करण्यासाठी प्रयत्नशील असतो. मोहोळ यांनी महापौर म्हणून करोना काळात चांगले काम केले. संकटकाळात नेत्याची खरी ओळख पटते. केंद्र आणि राज्य सरकारकडील पुण्याचे अनेक प्रश्न ते सातत्याने मांडतात.”


मोहोळ यांनीही यावेळी भाषणात पंतप्रधान मोदींसोबतचा एक किस्सा सांगत उपस्थितांची मनं जिंकली. त्यांनी सांगितले, “पंतप्रधानांनी एकदा सर्व राज्यमंत्र्यांना गप्पा मारण्यासाठी बोलावले होते. तेव्हा दिल्ली विमानतळावर छत कोसळल्याची घटना मी त्यांना सांगितली. त्यावर मोदी म्हणाले, 'तुम्ही अडीच तास उशिरा पोहोचलात !' त्यांच्या या वाक्यावरून केंद्र सरकारमधील कामकाज किती काटेकोर असते, याचा अंदाज मला आला. ' मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आपल्या नेत्यांवर बारकं लक्ष असतं. तिथे कोणतीही हौस

भागवण्याची मुभा नाही. पद नुसतं उपभोगायचं नसतं, तर जबाबदारीने काम करावं लागतं. भाजपमध्ये शिस्त ही सर्वात मोठी ताकद आहे."

Post a Comment

0 Comments